Saturday, September 22, 2012

डॉ० प्रह्लाद बापूराव वडेर (जन्म : मार्च ०४, १९२९, निपाणी – निधन : १५ जानेवारी, २०११, पणजी)

डॉ० प्रह्लाद वडेर यांचे लेखनकार्य
n  डॉ० सु० म० तडकोडकर
डॉ० प्रह्लाद बापूराव वडेर (जन्म : मार्च ०४, १९२९, निपाणी निधन : १५ जानेवारी, २०११, पणजी) गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रथम प्रोफेसर व सेवानिवृत्त प्रमुख होत. डॉ० वडेर इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर असल्याने त्यांनी काही काळ इंग्रजीचे अध्यापनदेखील केले होते. त्यांना गोमंतक मराठी अकादमीने अधिसदस्यत्वाचा बहुमान प्रदान केला होता, तसेच पुणे येथील निर्मलकुमार फडकुले पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. जळगांव येथील एका संस्थेनेही त्यांना विशेष बहुमान केला होता.
डॉ० वडेर यांनी आरंभापासून ललित लेखनाच्या सोबतीने समीक्षा लेखनही केले आहे. महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या स्तरावर अभ्यास करणाऱ्यांना स्वतंत्रपणे विचार मांडण्यासाठी स्वत:जवळ विचारांचे मूलद्रव्य असायला हवे, या विषयीची जाणीव निर्माण करण्यास उद्युक्त करायला लावणारे ड़ॉ० वडेर यांचे लेखन असते असे खचितपणे म्हणता येते.
त्यांची मराठीवरील भक्ती अभंग असली तरी ते इंग्रजीतील ललित व ललितेतर साहित्यकृतीही नियमितपणे वाचत व वेळप्रसंगी त्यातील काही अनुवादित करीत. प्रामुख्याने त्यांनी तुकारामांच्या लेखनात श्रीमद्भागवताचा व्यासंग दृग्गोच्चर होतो, असे संशोधनाद्वारे सिद्ध केले होते. त्यांच्या या लेखनातील दृष्टिकोनाचे ज्यांना महत्त्व जाणवायला हवे होते त्यांना, दुर्दैवाने, जाणवले नाही, याविषयीचा खेद व्यक्त करावा, असे वाटते.
त्यांनी जरी कोणत्या विशिष्ट अशा संप्रदायाशी वा मठाशी स्वत:ला बांधून घेतलेले नसले तरी, ते अधिक करून मौज संप्रदायाशी निगडित होते अन् रूपवादी समीक्षेचे समजूतदार ऋणाइत असावे असा अभिप्राय व्यक्त करीत.
 डॉ० वडेरांचे वाचन अफाट. ते  मराठी साहित्यविषयक विचारांचा धांडोळ घेत. ते वयाची ब्याऐंशी वर्षे काढल्यानंतरही डोळसपणे वाचन करीत. त्यांच्या निरीक्षणात आणि नेमकेपणे केलेल्या मांडणीत पक्के पण सकारात्मक स्वरूपाचे मतनिर्धारण आढळते. ते मराठीशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांना भिडत. त्यामुळेच त्यांच्या लेखांत मराठीत आणि मराठीच्या बाहेरील परिघात चाललेल्या साहित्यिक घडामोडींचा दर्पण न्याहाळण्यास मिळतोच तसेच त्यांच्या साहित्यिक स्वभावातील दुर्मिळ असा निरागस फटकळपणादेखील आढळतो, हे त्यांच्या लेखनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य. त्या फटकळपणामुळे त्यांचे कविवर्य शंकर रामाणी यांच्याशी बिनसले होते. डॉ० वडेर म्हणजे साहित्यावर मनस्वी प्रीती करणारी व्यक्ती होती, याविषयीची शंका उरत नाही. वाङ्मयावर निस्सीम, निरपेक्ष व निरागस प्रीती करणाऱ्या डॉ० वडेरांनी, आयुष्यभराचा, गोव्यात निवास करीत असताना स्थानिक साहित्यिकांच्या लेखनविलासावरही मन:पूर्वक लिखाण केले. विशेषत: त्यांनी मध्यवर्ती मराठी साहित्याचे पोषण करणाऱ्या लक्ष्मणराव सरदेसाई, पण्डित महादेवशास्त्री जोशी, कविवर्य बा० भ० बोरकर यांच्या लेखनावर भक्तियुक्त तसेच नवोदित, उदयोन्मुख युवा लेखकांच्या साहित्याविष्कारावर प्रोत्साहक स्वरूपाचे अभिप्राय व्यक्त करणारे लेखन केले.

बालपणापासूनचा प्रवास व संस्कार :
डॉ० वडेर यांच्या बालपणातील संस्कार त्यांच्या उर्वरित जीवनाला उपयुक्त पडलेसे दिसते. घरातील पुरोगामी वातावरण डॉ० वडेरांचे संस्कारशील युवामन घडवत होते. त्याच काळात त्यांनी मौज, सत्यकथा, अभिरुची या सारख्या मराठीतील उच्चभ्रू स्वरूपाच्या अनेक नियतकालिकांचे व साहित्यकृतींचे वाचन केले. त्यांनी चित्रकलेच्या एलेमेण्टरीइण्टरमिडियेट अशा दोन परीक्षाही दिल्या होत्या. विद्यालयीन जीवनात वर्गाचे हस्तलिखित मासिक संपादित करीत असताना त्यांना स्वत:लाच बव्हंशी ऐवजी लिहावा लागे. अशा प्रकारे घरात वाचन केल्याचा व चित्रकलेचा छन्द बाळगल्याचा लाभ त्यावेळी कामी येत असे.
डॉ० वडेर यांना बालपणी कीर्तनातही रस होता. कदाचित त्यामुळेच सेवानिवृत्त झाल्यानंतर, त्यांच्याशी त्यांच्या बालपणातील या रसिकाची पुनश्च भेट झालेली दिसते. अलिकडे डॉ० वडेर अध्यात्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमांसाठी व त्या प्रकारच्या साहित्याच्या प्रकाशनासाठी तन्मयतेने वावरताना दिसत, त्याचे कारण तेच असावेसे वाटते.
त्यांना, युवावस्थेत पदक्षेप केल्यानंतर, इंग्रजी चित्रपट पाहण्याचे आकर्षण होते. त्यांना विष्णू कृष्ण गोकाक या कन्नड भाषेतील थोर कवीने शेक्सपीअरचा परिचय करून दिला. ज्या मौज, सत्यकथा, अभिरुची या सारखी नियतकालिके वाचून बालपणात चित्ताची व बुद्धीची घडण झाली. त्या नियतकालिकांच्या संपादकांशी, कालांतराने, त्यांचे निकटचे संबंध आले. प्रा० श्री० पु० भागवत, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, विजया राजाध्यक्ष, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्यासारख्यांच्या सहवासात डॉ० वडेर यांची साहित्याभिरुची उमलू लागली. त्याचा लाभ त्यांना इंग्रजीतील एक मूर्धन्य कवी स्टीफन स्पेण्डर नामक कवीशी मौजसाठी संवाद (मुलाखत) करतेवेळी झाला. डॉ० वडेर यांनी पुढील आयुष्यात अशा प्रकारे नामवंतांशी संवाद साधण्याचा छन्दच जोपासला असे म्हणता येते. त्यांनी पण्डित महादेवशास्त्री जोशी, लक्ष्मणराव सरदेसाई, गंगाधर गाडगीळ व इतरांशी असे संवाद केले.
त्यांनी कवितालेखन केल्याचेही त्यांना स्मरते.
मध्यमवर्गीय माणसाला सर्वार्थी तब्येतीने राहायचे असते पण सेवा-चाकरी तर टाळता येत नाही. त्यांची पदवीधर झाल्यानंतर पोटापाण्याची व्यवस्था पाहण्याचे दायित्व नाकारता येण्यासारखी आर्थिक परिस्थिती नव्हती. डॉ० वडेरांना महाराष्ट्र शासनकृत राज्य परिवहन मण्डळाच्या तसेच महालेखापाल (अकाउण्टस जनरल)च्या कार्यालयांत एकाचवेळी दोन पदांवर नेमणूक झाल्याची वेगवेगळी पत्रे मिळाली. त्यांनी महालेखापालांच्या कार्यालयात सेवा-चाकरी करण्याचा पर्याय स्वीकारला. त्यामुळे त्यांना पदव्युत्तर अध्ययन करण्यासाठी सकाळची वेळ उपलब्ध होऊ शकत होती.
या काळातच त्यांच्या समीक्षापर दृष्टिकोनाचे स्वरूप आकारण्यास आरंभ झाला. १९५५ ते ६० हा त्यांच्या मुंबईतील वास्तव्याचा सुवर्णकाळ होता. ते या संदर्भात म्हणतात:
मुंबईत त्यावेळी सत्यकथा, वीणा या मासिकांचे चांगल्या अर्थाने अड्डे होते. अभिरुचीचे (पुरुषोत्तम आत्माराम) चित्रे बडौदा सोडून मुंबईत स्थिर होऊ पाहत होते. त्याचा मुलगा दिलीपशी माझी गट्टी जमली. सत्यकथेच्या ऑफिसात दर शनिवारी गंगाधर गाडगिळांपासून शामराव ओक ते ज्ञानेश्वर नाडकर्णीपर्यंत अनेक साहित्यिक जमत. वीणाचे संपादक उमाकान्त ठोमरे यांच्याकडे दळवी, रमेश मंत्री, वसंत सबनीस यांची मैफल जमे. या दोन्ही अड्ड्यात मला प्रवेश होता. चित्रे यांच्यामुळे माझा चित्रकार द० ग० गोडसे यांच्याशी संबंध आला. तिथे अभिरुचीच्या विमलाबाई चित्रे संस्कृत नाटके भाषांतरित करीत, चर्चा करीत. पुढे छन्द मासिकाचा जन्म झाला. त्यामुळे कधी कधी दिलीप व मी पु० शि० रेगे यांच्या घरी जात असू. गंगाधर गाडगीळ यांच्या नागपाड्याच्या घरी महिन्यातून एकदा चर्चेसाठी आम्ही जमत असू. एका बैठकीत गाडगीळांच्या उन्हाळा या कथेवर इतके बदल सुचवले गेले, की त्यामुळे वासंतीबाई वैतागल्या... ते १९६२त गोव्यात आले आणि त्यानंतर ते इतरत्र गेले नाहीत.

डॉ० वडेर यांच्या ललित लेखनाचे स्वरूप :
       डॉ० वडेर स्वत:च्या आरंभीच्या लेखनाच्या संदर्भात आठवणी नोंदविताना लिहितात,
माझा पहिला लेख का० रा० पालवणकरांच्या खेळगडी या मुलांच्या मासिकात छापून आला. वर्ष बहुतेक १९४३-४४ असावे. लेखाचे नाव होते, उगीच. उगीच या शब्दाचा उपयोग आपण कसा करतो हे सांगताना त्यावर फडके यांच्या लघुनिबंधाची छाप होती. फडक्यांच्या लेखनातला नर्मविनोद शैलीचा प्रवाहीपणा, भाषेचा प्रसन्नपणा यात फडक्यांच्या तुलनेने खांडेकर कृत्रिम वाटले. त्यांच्या लेखनातील उपदेशही नको वाटे, फक्त त्यांच्या काही कोट्या चमकदार वाटत.
       डॉ० वडेर यांनी पुढील काळात पीएच० डी० साठीच्या प्रबंधलेखनासाठी नारायण सीताराम फडके या मराठीतील चमकदार कामगिरी करून दाखविणाऱ्या साहित्यिकाच्या लेखनकृतींची निवड केली, ती बालपणापासूनच त्यांच्यावरील फडके यांच्या प्रभावामुळेच असावीसे दिसते.
       डॉ० वडेरांनी आरंभापासून मराठीत लघुकथा लेखन केले. त्यांचे चढण, वीज, रक्तखुणा हे तीन संग्रह लेखकाच्या प्रतिभेचा (व प्रज्ञेचाही) परिचय करून देते.
       डॉ० वडेर स्वत:वर मराठीतील नवकविता व नवकथा या नव्या साहित्यलेखनधारांचा प्रभाव पडला होता, ही वस्तुस्थिती मोकळ्या चित्ताने मान्य करतात. व नवकथेच्या वाटचालीत स्वत:चाही एका खारीचा वाटा असल्याचे अभिमानाने नोंदवितातही. या संदर्भात ते म्हणतात :
नवकाव्य व नवकथा यांचा तो बहराचा काळ होता. मी मुंबईत असल्याने त्यांची वाटचाल मला अगदी जवळून पाहता आली. नवकथाकारांपैकी गाडगीळ, भावे व व्यंकटेश माडगूळकर मला अधिक भावले. भावे-गाडगिळांच्या प्रयोगशीलतेचा माझ्यावर प्रभाव पडला. अरविन्द गोखले प्रयोगशील असूनही चमत्कृतीच्या आहारी जातात असे वाटले. पुढे भावे-माडगूळकरांनी नवकथेवर टीका व्हायला लागल्यावर आपण नवकथाकार नाही, असे जाहीर केले, हे मला आवडले नाही. त्यावेळी भावे यांच्या भाषेचा मला मोह पडला; पण भाषेपासूनही लेखकाला धोका असतो, हेही लक्षात आले. पुढे जी० एं०च्या कथेतील प्रतिमांचाही धोका जाणवला. त्यामुळे त्यांची कथाही मला काहीशी कृत्रिमच वाटली. पण गाडगीळ व भावे कथेगणिक जी रिस्क घेत व प्रत्येक अनुभवाचा वेगळा आकार शोधण्याचा प्रयत्न करीत त्याचा माझ्या कथालेखनावर खूप परिणाम झाला. भावे यांच्या प्रेमकथा, गाडगिळांची काजवा, कडू आणि गोड, किडलेली माणसे व तलावातले चांदणे, गोखल्यांची मंजुळा व कातरवेळ या कथा कायम लक्षात राहिल्या. भावे यांनी मुक्तीसाठी विल्यम सारोयामच्या The Daring Young man on the Flying Trapeze’ या कथेचा जसाच्या तसा वापरलेला फॉर्म लक्षात राहिला.
नवकथाकारांनी मराठी कथेचा तोंडवळा बदलून टाकला. मराठी कथेच्या अनेक अनावश्यक ओझ्यातून तिला मुक्त केले आणि आमच्यासारख्या कथाकारांना एका नव्या दृष्टीचा शोध लागण्याला मदत केली... त्यामुळे आमच्यासारखे लेखक फडके-खांडेकर-य० गो० जोशीसारख्यांच्या प्रभावातून फार लवकर मुक्त झाले. साहित्यातले दिखाऊ रंग कोणते आणि टिकाऊ कोणते याची जाणीव झाली.
मी कथांबरोबरच ललितलेख, नाटिका, प्रवासवर्णन, समीक्षाही लिहिली. कर्नल मनोहर माळगावकर व अनेक युरोपियन कथाकारांचे अनुवाद केले...नवकथा विविध प्रयोगशीलतेने गाजत होती, तर मर्ढेकर आपल्या काव्यविषयक प्रयोगातून रसिकांना तीव्र पण सुखद धक्के देत होते. त्यामुळे आमच्यासारख्या नव्या लेखक-कवींच्या जाणिवांचे क्षितीज विस्तारण्यास मदत झाली.
नव्या लेखक-कवींच्या जाणिवांचे क्षितीज शोधत शोधत वडेरांनी कथालेखन केले. त्यांच्यावर मोपांसाच्या लेखनशैलीचा प्रभाव पडला असणे शक्य आहे. पु० शि० रेगे यांच्याप्रमाणेच वडेरांची शैली अल्पाक्षरी आहे. मोपासांच्या लेखनशैलीचे हेच वैशिष्ट्य सांगितले जातो. वडेरांच्या लेखनात पाल्हाळाला विशेष वाव नसतो. रशियन साहित्यिक अन्तोन चेकॉव्हचाही वडेरांच्या लघुकथालेखनशैलीवर काही प्रमाणात प्रभाव असल्याचे दिसते. चेकॉव्हने संज्ञाप्रवाहात्मक लेखनशैलीचा अवलंब केला होता. तो नंतर जेम्स जॉयस आणि इतर आधुनिकवादी लेखकांनी स्वीकारला. वडेरांच्या लघुकथालेखनात चेकॉव्ह अनेकवेळा जाणवतो तो त्यांनी स्वीकारलेल्या संज्ञाप्रवाहात्मक लेखनशैलीमुळे, असे म्हणता येईल. त्यांच्या कथांचा अभ्यास करू पाहणाऱ्यांस उपरोल्लेखित अवतरणांतर्गत नोंदविलेल्या वातावरणाची पार्श्वभूमी जाणून घेणे आवश्यक वाटले पाहिजे.

डॉ० वडेर यांच्या समीक्षापर लेखनाचे स्वरूप :
       डॉ० वडेरांनी अध्यापनाचा पेशा स्वीकारण्यापूर्वीही समीक्षापर लेखनकार्यास आरंभ केला होता. त्यामुळे त्यांचे लेखन व्यावसायिक अनिवार्यतेमुळे आकाराला आले, असे म्हणता येणार नाही. डॉ० वडेर स्वत:त दडून असलेल्या ऍङ्ग्री यङ्ग मॅन नामक भूमिकेच्या प्रेमातच पडलेले दिसतात. त्या संदर्भात त्यांनी कैकवेळी नोंदी केल्या आहेत.
दिलीप चित्रे यांच्याबरोबर तत्कालीन संतप्त तरुणांशीही माझे सूर जुळले होते. त्यात अरुण कोलटकर, भाऊ पाध्ये, हमीद दलवाई, अशोक शहाणे हे होते... माझ्या लेखनात माझी भूमिका सतत ऍङ्ग्री यङ्ग मॅनचीच राहिली. माझी समीक्षा परखड झाली. सर्वच वाङ्मयप्रकारांत मला रस आहे. समीक्षात्मक व सर्जनात्मक अशी दोन्ही अंगे माझ्या लेखनात आहेत. त्यामुळे केवळ समीक्षकाला न दिसणाऱ्या प्रतिभावंताच्या काही विशेष धुक्यात गुरफटलेल्या जागा मला नेहमी खुणावतात. बोजडपणा, दुर्बोधता, कोरडेपणा, तुच्छता यांपासून माझी समीक्षा नेहमीच दूर राहिली. विशेष घोळ घालून, सोप्या गोष्टी अवघड करण्यात काहींचा हातखंडा असतो, जो माझ्यात नाही. वाङ्मयाप्रमाणेच समीक्षाही वाचनीयच हवी असे मला वाटते...
       मी मौज, वीणा, व नंतर नवशक्ती, वसन्त मधून साहित्य व समीक्षाविषयक सदरे लिहिली. त्यातून मराठी वाचकांना ब्रिटिश, युरोपियन वाङ्मयातील महत्त्वाच्या वाङ्मयीन घटनांबद्दल माहिती करून दिली. बेकेटचे वेटिंग फॉर गोदो, रशियन वाङ्मयातील नवी मूल्ये, अनुवादाची कला, छोट्या नियतकालिकांची एकांडी शिलेदारी, ब्रिटिश काऊन्सिल लायब्ररीत भरणारी पुस्तक परीक्षणे, स्पेण्डरसारख्यांचे काव्यवाचन व मुलाखती यावर मी लिहिले...
वाङ्मयातील अनिष्ट प्रथांनाही मी विरोध केला. नेमाडे पंथीयांनी अलीकडे माजविलेल्या सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध मी अनेकदा लिहून त्यातील भंपकपणा, एकांगीपणा, एकारलेपण उघड केला. आम्ही सांगू तेच कादंबरीकार (उदा० साने गुरुजी व भाऊ पाध्ये), आम्ही सांगू तेच कवी, तेच कथाकार श्रेष्ठ हा आग्रह मला असहिष्णुपणाचा वाटतो. नेमाडे यांचा देशीवादही मला पटला नाही. १९६० नंतरचे मराठी साहित्य हेच खरे साहित्य हा काहींचा आग्रहही मला त्याज्य वाटतो. दलित साहित्याचे मी सुरुवातीपासून समर्थन केल. पण त्यात तोचतोचपणा येऊ लागल्यावर टीकाही केली. पण स्तुती आवडली, तरी दलित लेखकांना टीका आवडली नाही व मला एकदोन धमकीवजा पत्रेही आली
ग्रामीण साहित्यातील बोली व भाषेचा वादही असाच गाजला. प्रादेशिकतेचा वेगळा विचार मी माडण्याचा प्रयत्न केला. आनंद यादव व बोराडे यांनी अनुक्रमे गोतावळापाचोळा मधून संपूर्ण  कादंबरी बोलीभाषेत लिहिण्याचा आग्रह धरला. तो किती असमंजसपणाचा आहे यावर मी लिहिले. वाङ्मयातील प्रादेशिकतेचा वेगळा विचार मांडताना अपरिचित शब्दाखाली अनुभव झाकोळू लागला, तर तो अन्य मराठी विभागात कसा अनाकलनीय होईल हे मी दाखविले. प्रादेशिक वातावरणाचा अतिरेक करणे आणि जितके अपरिचित शब्द जास्त तितकी ती कलाकृती अस्सल मानणे हा मला एक प्रचंड गैरसमज वाटतो. वातावरणनिर्मितीसाठी जेवढी आवश्यक तेवढीच प्रादेशिकता आद्य प्रादेशिक कथाकार वि० स० सुखठणकर व नंतर लक्ष्मणराव सरदेसाई यांनी दाखविलेल्याची उदाहरणे आहेत.
वरील प्रदीर्घ उताऱ्यावरून डॉ० वडेर स्वत:च्या ऍङ्ग्री यङ्ग मॅन नामक या भूमिकेत किती समाधानकारकपणे डुंबले आहेत, हे स्पष्ट होऊ शकते. डॉ० वडेर इंग्रजी साहित्याचे पदव्युत्तर असल्याने त्यांनी काही काळ इंग्रजीचे अध्यापनदेखील केले होते; परन्तु प्रामुख्याने ते मराठीशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांना भिडतात. त्या निमित्ताने त्यांनी मराठीतील साहित्यिक आंदोलने व हिंदोळे अशा विषयांवर लिहिताना संताप व्यक्त केला आहे.
डॉ० वडेर भाषाशुद्धीसाठी वा शुद्ध निखळ मराठी शब्दप्रयोगासाठी ऍङ्ग्री यङ्ग मॅन होऊन काही कामगिरी बजावतात, असे दिसत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे मूलतत्त्ववाद्यांचा जसा अट्टाग्रह असतो तसा डॉ० वडेरांचा असत नाही. जो पर्यन्त जुने शुद्धलेखनाचे नियम होते. तो पर्यन्त त्यांनी त्यांचे मन लावून उपयोजन केले. ज्या दिवशी नवीन शुद्धलेखनाचे नियम आले, त्या दिवसापासून त्यांनी त्यांचा अंगिकार केला. इतकेच नव्हे तर असा पुरस्कार करणाऱ्यांचा शक्य होते तेव्हा, तसेच शक्य तितक्या सौम्य भाषेत समाचारही घेतला.
ते प्रा० अनंत काकबा प्रियोळकर वा डॉ० सुरेश रामकृष्ण चुनेकर यांच्यासारखे जुन्या शुद्धलेखनाच्या नियमांसाठीचे आग्रही राहिले नाहीत. प्रा० प्रियोळकर यांनी आपण ज्या शुद्धलेखनाच्या नियमांस अनुसरून जे लेखन करतो ते जी नियतकालिके स्वीकारणार नाहीत. तीत लेखन करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञाच केली होती.
 डॉ० वडेर कदापि परसवर्णाच्या पक्षाचे पुरस्कर्ते राहिले नाहीत. त्यामुळे ज्यांनी अशा प्रकारचे लेखन केले ते अवतरणासाठी वा संदर्भासाठी घेतानादेखील डॉ० वडेर परसवर्णाची रचना टाळून ते संदर्भ घेतात! परिणामी कविवर्य दा० अ० कारे यांच्या कवितांतील चरणांत कितीही परसवर्ण असोत, ते डॉ० वडेरांनी धुडकावूनच लावले. त्यांचे परमप्रिय मित्र डॉ० सुभाष भेण्डे स्वत:च्या नावात परसवर्णाचे उपयोजन जरी करीत असले तरी डॉ० वडेरांनी त्यांचे नाव लिहिताना आरंभी डॉ० सुभाष भेंडे असेच लिहिले पण कालांतराने त्यांना भेण्डेंचा आग्रह मोडवेनासा झाला असावा. भेण्डें यांच्या स्थळी आणखी अन्य कोणी असता तर डॉ० वडेरांनी आपलाच आग्रह पुढे चालविला असता
डॉ० वडेरांनी सर्वच लेखसंग्रहात मराठीत आणि मराठीच्या बाहेरील परिघात चाललेल्या साहित्यिक घडामोडींचा दर्पण न्याहाळण्यास मिळतो. या लेखांद्वारे मराठी साहित्यविषयक विचारांचा धांडोळ घेतला आहे. त्यांत सैद्धान्तिक तसेच उपयोजित स्वरूपाचे लेख आढळतात. त्यांनी मृत्यूशी निगडित असलेल्या विषयांच्या अनुरोधाने मरणकल्पनेशी थांबे शोध जाणत्यांचा तसेच प्रतिभावंतांच्या आत्महत्या असे काही तात्त्विक स्वरूपाचे लेखनही केले आहे. डॉ० वडेरांना विभावरी शिरूरकरांचे लेखन म्हणजे सामाजिक दस्तऐवज तर गौरी देशपाण्डे ही आयुष्याची उत्खनन करणारी लेखिका होय असे वाटते. स्वर्गस्थ गंगाधर गाडगीळांनी बाळ सीताराम मर्ढेकरांना दुसरे केशवसुत असे संबोधले होते तर डॉ० वडेरांनी अलिकडेच दिवंगत झालेले कवी अरुण कोलटकर हे दुसरे मर्ढेकर होत असे उद्घोषित केले आहे. त्यांनी, अर्थातच, स्वत:च्या या मतप्रतिपादनासाठी तर्कदृष्ट्या उचित अशी मांडणी केली आहे. ज्ञानपीठासाठी मायमराठीचे गर्भाशय कोते? मायमराठीला स्वत:ची संस्कृती नाही?
समीक्षकांना ना० सी० फडक्यांची ऍलर्जी का? एकप्रकारे आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त व उपयुक्त व्हावेत असे मूलभूत स्वरूपाचे प्रश्नही उपस्थित केले आहेत. डॉ० वडेरांनी फडके यांच्या साहित्यावर डॉ० गं० ब० ग्रामोपाध्ये यांच्या मार्गदर्शनानुसार पीएच० डी० ची पदवीसाठीचे संशोधन केले होते, हे संबंधितांना स्मरत असेलच. या संग्रहातील अत्यंत महत्त्वाचा लेख म्हणजे नरसिंहरावांनी केलेली मराठी साहित्यिकांची कानउघाडणी होय. तो मूळातूनच वाचायला हवा. जागतिकीकरणाच्या त्सुनामीत मराठीचे होडके, पहिली भारतीय इंग्रजी कादंबरी राजमोहन्स वाईफ, रशियनांना भावलेला राजा ययाती, पालग्रेव्हच्या द गोल्डन ट्रेझरीच्या निमित्ताने हे आणखी काही विचारप्रवृत्तक लेख होत.
डॉ० वडेर मराठी समीक्षेतील एकाक्ष मठाधिपती या लेखात, पांढरपेशा वाचकांचा उपहास करायचा पण ग्रामीण-दलित साहित्यासाठी डोळ्यांतील अश्रूंच्या नद्या जोडण्याचा मराठी समीक्षकांचा उद्योग सध्या जोरात आहे, असे म्हणतात. अशी स्पष्टोक्ती पानापानावर आढळते. महाविद्यालयीन व विद्यापीठाच्या स्तरावर अभ्यास करणाऱ्यांना स्वतंत्रपणे विचार मांडण्यासाठी स्वत:पाशी विचारांचे मूलद्रव्य असायला हवे, या विषयीची जाणीव निर्माण करण्यास उद्युक्त करायला लावणारा हे लेख आहेत, असे खचितपणे म्हणता येते.
डॉ० वडेर यांच्या निधनामुळे काय झाले असा प्रश्न विचारायचे ठरविले तर माझ्या पिढीतील लेखकाला मार्गदर्शन करणारा, सकारात्मक स्वभाववृत्ती असेलला, तसेच वैचारिक, नैतिक बळ असलेला एक समर्थ विचारक नाहीसा झाला, असे खचितपणे म्हणता येते. तसे वयोमानपरत्वे होणारच होते: परन्तु काहींचे जाणे होऊच नये, असे वाटायला लावणारे हे व्यक्तिमत्व होते, अन् अशा व्यक्तिमत्वांच्या सहवासात आपण क्वचितच येतो.

No comments:

Post a Comment